ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 30 - राज्यात १ जूनपासून केलेल्या जाणाऱ्या शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यास शेतकरी समन्वय समितीने तयारी दर्शवली आहे.
आज सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक होईल. मात्र, बैठकीत कर्जमाफीच्या विषयावर निर्णय झाला तरच पुढील चर्चा होईल, अशी अट शेतकरी समन्वय समितीने टाकली आहे.
कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु असून १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय राज्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
आज सकाळी ११ वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबा येथे येऊन आंदोलकांची भेट घेत त्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले.
मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो असून शेतकऱ्यांसाठी सरकारने चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले असल्याचे ते म्हणाले. खोत आंदोलकांना भेट देऊन गेल्यानंतर आंदोलकांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेतली.
बैठकीनंतर जयाजीराव सुर्यवंशी व धनंजय जाधव यांनी वरील निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आंदोलक तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत. कर्जमाफीच्या निर्णयानंतरच बैठकीत पुढील चर्चा होईल, असे संघटनेने जाहीर केल्यामुळे सायंकाळच्या बैठकीत मुख्यमंत्री काय तोडगा काढणार? याबाबत उत्सुकता आहे.
शेतक-यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना