मुंबई : मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. मात्र, या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी आज यू-टर्न घेतला आहे. भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचा आम्हाला फायदाच झाला असे सांगत मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केला गेल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला फायदाच झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आमची पार्टी कोणाचीही मालकी होऊ शकत नाही. ती कार्यकर्त्यांच्या मालकीची आहे. कालच्या आकुर्डीतील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माध्यमांनी बातमी दाखविण्याअगोदर पडताळणी करावी. जुन्यांना डावलले असे नाही, 27 तिकीटं नव्या लोकांना दिली. भाजपामध्ये मेगा भरतीचा निर्णय कोअर कमिटीचा होता. माझ्या एकट्याचा नव्हता."
दरम्यान, भाजपाने सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून आयारामांना संधी दिली. त्यामुळे नुकसान झाल्याची उपरती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काल झाली होती. आकुर्डीतील पक्षाच्या बैठकीत भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली पाटील यांनी दिली होती. ते म्हणाले होते, "हा माझा, हा तुझा यामुळे भाजपाचे नुकसान झाले आहे. ‘दिल के नजदीक है’ याला महत्त्व नसून ‘पार्टी के नजदिक है’ याला महत्त्व द्यायला हवे. मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती."