मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.
मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही.
कुठे करायचा अर्ज? ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. भरावयाच्या पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
अर्ज करताना काय घ्याल काळजी? सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये.
असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही असे महाजन यांनी स्पष्ट केले. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबविली जाईल.