ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबईच्या मध्य,पश्चिम व हार्बर या तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर, हार्बर रेल्वेच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
पश्चिम मार्गावर सांताकु्रझ ते माहीम स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे. या कालावधीत सांताक्रुझ ते माहीम स्थानकांतील वाहतूक धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येतील. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. माटुंगा ते मुलुंड स्थानकातील
धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. मुलुंड स्थानकाहून पुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेल-अंधेरी लोकलसेवा बंद
नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप, डाऊन या मार्गांवर मेगाब्लॉक असेल. या कालावधीत नेरूळ ते पनवेलदरम्यानची वाहतूक सकाळी ११.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत बंद राहील. पनवेल ते अंधेरी मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीएम ते नेरूळ, ठाणे ते नेरूळ या मार्गावर लोकलच्या विशेष सेवा चालवण्यात येतील.
गोंधळ सुरूच
हार्बर रेल्वेवर शनिवारी सकाळी कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. संबंधित कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत बिघाड दूर केला. मात्र सकाळी झालेल्या बिघाडाचा फटका अन्य लोकल सेवेला बसला. तत्पूर्वी, मंगला एक्स्प्रेसमुळे मध्य मार्गावरील लोकल सेवांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.