अंबाजोगाई (जि. बीड) : बीड जिल्हा बँक घोटाळ्यातील संशयित आरोपी व बँकेचे माजी संचालक, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अॅड. मेघराज बाबुराव आडसकर (५०) यांनी बुधवारी मध्यरात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. बेकायदेशीर कर्जप्रकरणास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, सुभाष सारडा हे जबाबदार असल्याचा दावा करतानाच, पोलिसांच्या चौकशीला वैतागून हे पाऊल उचलल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलेय. या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे.अॅड. आडसकर यांचा हाउसिंग सोसायटी परिसरात बंगला आहे. मेघराज यांची मुले लातूर येथे शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या पत्नीही तेथेच होत्या. बंगल्यात बुधवारी रात्री ते एकटेच होते. मध्यरात्रीनंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याची माहिती गुरुवारी दुपारपर्यंत कोणालाच नव्हती. मेघराज हे सकाळी ११ वाजेनंतर खोलीबाहेर येतात. त्यामुळे त्यांना सुरक्षारक्षाकानेही सकाळी झोपेतून उठविले नाही. काही कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर आले होते. दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा आत मेघराज यांचा जळालेला मृतदेह आढळला. या घटनेची माहिती अंबाजोगाई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यासमोर गर्दी केली. (प्रतिनिधी)
मेघराज आडसकरांची आत्महत्या
By admin | Published: July 22, 2016 5:37 AM