चंद्रशेखर जोशी, ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ - शहराचा मानबिंदू असलेल्या मेहरूण तलावाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती, सुशोभिकरण होऊ शकलेले नव्हते. त्यातच दोन वर्षात तलावाच्या व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीने तो अक्षरश: रिकामा झाला होता. मात्र गेल्या जून महिन्यात महापालिकेच्या आवाहनानुसार क्रेडाई व जिल्हा इंजिनिअर्स असोसिएशनने केलेल्या मदतीने ही गळती दूर होण्यास मदत झाली आणि आता पहाता पहाता हा तलाव तुडुंब भरला. लोकसहभागाच्या आदर्शातून दोन वर्षापासूनची एक गंभीर समस्या दूर होण्यास मदत झाली व तलावास गत वैभव प्राप्त झाले आहे. मेहरूण तलाव म्हणजे केवळ शहरच नव्हे तर खान्देशचे वैभव. या तलाव परिसरातील बोरे ‘मेहरूणची बोरे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र या परिसरालाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन ते तीन वर्षात हा तलाव की डबके अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कारण तलावाच्या व्हॉल्व्हवरील गळती. अनेक प्रयत्न करूनही ही गळती थांबत नव्हती. त्यातच या तलावाच्या मजबुतीकरण व सुशोभिकरणासाठी आतापर्यंत तीन वेगवेगळे प्रस्ताव ते शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली नाही.
मेहरूणी नाला ते मेहरूण तलावमेहरुण गावाच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी ब्रिटीशकाळात मेहरुणी नाल्याचे पाणी अडवून त्याला मेहरुण तलावात रुपांतर करण्यात आले़ बॉम्बे अॅक्ट १८७९ च्या नियमानुसार या ६२ हेक्टर तलाव प्रदेशाला शासकीय जागा म्हणून घोषित करण्यात आले होते़ ११ मार्च १९७९ मध्ये वनविभागाकडून शासनदरबारी तलावाची नोंद करण्यात आली़ त्यानंतर शासनाने महसूल विभागाकडे तलावाची मालकी सोपविली़ ३६ लक्ष ६५ हजार घन मीटर पाणी साठवण क्षमता असलेला तलाव तीन वर्षापूर्वी भरला होता़ नंतर तलावाला व्हॉल्व्ह गळती लागली. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हजारो लीटर पाणी सलग दोन वर्षे वाया गेले़ एवढेच नाही तर नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात हे पाणी जाऊन तेथे मोठी दलदल निर्माण झाली होती व काही चंदनाची झाडे कुजून पडली होती. वनसंपदेलाही यामुळे बाधा निर्माण झाली होती.
असा घेतला शोधया तलावावर ब्रिटीश कालीन पाणी पुरवठा योजना होती. तलावाच्या बांधाजवळून त्याची पाईप लाईन होती व बांधानजीक व्हॉल्व्ह व चेंबर होते. क्रेडाई (कॉनफॅड्रेशन आॅफ रियल इस्टेट डेव्हलपर) व जिल्हा इंजिनअर्स असोसिएशनच्या सदस्यांनी या ठिकाणी अभ्यास करून नेमक्या ठिकाणी खोदकाम करावयास लावले तेव्हा ही पुरातन पाईप लाईन व मोठ्या झडपेचा व्हॉल्व्ह दिसला. व्हॉल्व्ह काढून पाईप लाईनचे तोंड काँक्रीटने बंद करण्यात आले व ही गळती थांबविण्यात आली. केवळ लोकसहभागामुळेच हे शक्य होऊ शकले व आज तलावात ओसंडून वाहण्याच्या स्थितीत असून त्यास गतवैभव प्राप्त झाले आहे. सार्थ अभिमानमहापालिकेच्या आवाहनानुसार शहराचे वैभव असलेल्या तलावावरील गळती थांबविण्यात यश आले. या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. - अनिश शहा, अध्यक्ष केरडाई