यदु जोशीमुंबई : एसआरए घोटाळ्याच्या आरोपाची शाई वाळलेली नसताना, आज गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नव्या घोटाळ्यांचे आरोप झाल्याने, त्यांच्यावरील संकट गडद झाले असून, त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. मेहतांच्या मंत्रिपदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे.गृहनिर्माणमंत्री मेहतांवर एकामागून एक घोटाळ्यांचे आरोप होत असताना, मुख्यमंत्री त्यांना राजीनामा द्यायला सांगतील किंवा त्यांचे खाते बदलले जाईल, असे म्हटले जात आहे. आताच मेहतांची हकालपट्टी केली, तर ‘मीडिया ट्रायल’ला सरकार बळी पडल्याचे वा विरोधी पक्षांच्या दबावाखाली आल्याचे चित्र निर्माण होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना घरचा रस्ता दाखवावा किंवा त्यांच्या खात्यात बदल करावा, असाही एक विचार भाजपात आहे. मेहतांच्या भवितव्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेतील.मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ केला.मंत्रिपदावर असताना नि:पक्ष चौकशी कशी होणार?‘प्रकाश मेहता का उल्टा चष्मा’... ‘मी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली, पण राजीनामा देणार नाही’ असे लिहिलेले बॅनर विधिमंडळात विरोधकांनी फडकावले. मेहतांवरील आरोपांची चौकशी एक महिन्याच्या आत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता हा विषय संपला असल्याचे सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट म्हणाले.मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांनी मेहता मंत्रिपदावर असताना, निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते, असा सवाल केला. विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी मेहतांवर तोफ डागली. गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोन वेळा तर विधान परिषदेचे कामकाज तब्बल नऊ वेळा तहकूब झाले.
मेहतांचे मंत्रिपद धोक्यात, नवीन आरोपांमुळे अडचणीत वाढ; राजीनाम्यावर विरोधक ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:27 AM