औरंगाबाद : कांचननगर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या नावे बनावट खाते उघडून त्यांची सात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००६ ते २०१० या कालावधीत घडला.कांचननगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे कार्यालयीन कामकाज पाहण्यासाठी मुकुंद कुलकर्णी याची नेमणूक केली होती. त्यास सोसायटीचे सभासद मानधनही देत असत. दरम्यान, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही जमीन एका बिल्डरला विकास करण्यासाठी दिली. २००६ ते २०१० या कालावधीत सोसायटीच्या सभासदांकडून राजीनामे घेणे आणि बिल्डरसोबत चर्चा करून त्यांनी दिलेली रक्कम सभासदांना देण्याचे काम कुलकर्णीकडे होते. या कालावधीत त्याने सोसायटीच्या सभासदांचे राजीनामे मागून घेतले. त्या वेळी बिल्डरने सभासदांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश दिले. हे धनादेश सभासदांना देणे अथवा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे त्याचे काम होते. मात्र, त्याने सभासद आणि बिल्डर यांची भेट होऊच दिली नाही. उलट बिल्डरकडून घेतलेले धनादेश वटविण्यासाठी त्याने सभासदांच्या नावाचे बनावट बँक खाते उघडले. त्या खात्यात हे धनादेश जमा करून रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. हा प्रकार समजताच संस्थेचे अध्यक्ष अरुण कल्याणकर यांनी सभासदांच्या वतीने सातारा पोलीस ठाण्यात २० आॅक्टोबर रोजी तक्रार दिली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहकारी संस्थेच्या सभासदांना सात लाखांचा गंडा
By admin | Published: October 22, 2015 1:31 AM