नागपूर : जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सार्थकबाधक चर्चा करण्यासाठी संसदेत शालिनता, अनुशासन आणि शिष्टाचार बाळगावा. संसद सदस्यांनी मतदारांच्या अपेक्षा गोंधळात दडपू नयेत. त्यांनी संसदेत केवळ चर्चा करावी, संसदीय कामकाजात अडथळा आणू नये, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसद सदस्यांना केले आहे.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सहभागी होण्यासाठी त्या नागपुरात आल्यानंतर त्यांनी संपादकांशी विशेष संवाद साधला. संसदेच्या सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी शिस्त बाळगण्याबाबत लोकसभेतील सर्व सदस्यांना पत्रसुद्धा लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या, ‘लोकसभेत संसद सदस्यांच्या वर्तनावरून सामान्य जनतेत तीव्र प्रतिक्रिया आहेत. संसद सदस्यांद्वारे सभागृहात ‘वेल’मध्ये येऊन गोंधळ घालणे, नारेबाजी करणे, घोषणा लिहिलेल्या पाट्या दाखविणे चुकीचे आहे.’ २५ सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, ‘मी सभागृहात आईची भूमिका बजावित असते. अशा वेळी कधी-कधी मला सदस्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलावी लागतात.काँग्रेस सभागृहात चर्चेलाच दडपण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक नेहमीच वरचढ राहिले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते सरकारला गंभीर प्रश्न विचारू शकतात. अशा परिस्थितीत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करणे योग्य नाही. संसदीय कार्यप्रणाली नेहमीच विरोधी पक्षाच्या बाजूनेच चालत राहिली आहे. मात्र, त्यानंतरही विरोधी पक्ष कामकाजातच अडथळा आणतो,’ असे त्यांनी सांगितले. जीएसटी आणि भूमी संपादनाच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, ‘भाजपाने जीएसटीचा विरोध काही कारणांमुळे केला होता. केंद्र जीएसटीमध्ये राज्य सरकारांना योग्य हिस्सेदारी देण्यास तयार नव्हते. राज्य सरकार पूर्णपणे केंद्रावर अवलंबून होती. पंतप्रधान यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जीएसटी विधेयकात सुधारणा केली आहे. आता केंद्र सरकारला जीएसटीमध्ये केवळ ३८ आणि राज्य सरकारला ६२ टक्के हिस्सेदारी देण्यात येईल. या विधेयकातील ही एक प्रमुख सुधारणा आहेत. (विशेष प्रतिनिधी)
मतदारांच्या अपेक्षांना खासदारांनी गोंधळात दडपू नये
By admin | Published: October 27, 2015 1:58 AM