मुंबई : दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास २३ महिन्यांचा विलंब झाल्यामुळे स्मारकाच्या खर्चात १६६ कोटींची वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत स्मारकासाठी ५९१ कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून, यासाठी मेसर्स शशी प्रभू अॅण्ड असोसिएट्स यास आतापर्यंत ३.४४ कोटी देण्यात आले आहेत. दरम्यान, स्मारकाचे भूमिपूजन झाले तेव्हा शासनाने यासाठी ४२५ कोटी खर्च येणार असल्याचे म्हटले होते.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या वेळी राज्य शासनाने ४२५ कोटी खर्च येणार असल्याची माहिती दिली होती.>अंदाजित खर्च ५९१ कोटींचाएमएमआरडीएने माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिलेल्या माहितीनुसार, इंदू मिल येथील स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८४१४.८३ चौरस मीटर आहे. या जागेचा ताबा एमएमआरडीएने शासनाच्या वतीने २५ मार्च २०१७ रोजी घेतला. स्मारकाच्या बांधकामासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी रचना व बांधकाम या तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अॅण्ड असोसिएट्सची नियुक्ती केली आहे. संबंधिताला आतापर्यंत ३.४४ कोटी रक्कम देण्यात आली आहे. स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले होते.
स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला, कामास विलंब झाल्याचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:24 AM