- आनंद भाटेबालगंधर्व उर्फ श्रीपाद नारायण राजहंस म्हणजे संगीत रंगभूमीच्या इतिहासातील सोनेरी पान! बालगंधर्वांवर चित्रपट काढायची कल्पना ही सुबोधची. त्याला जेव्हा शास्त्रीय आणि नाट्य संगीताची गोडी लागत गेली त्या वेळी त्याच्या हातात भा.द. खेर यांनी बालगंधर्वांवर लिहिलेले ‘गंधर्वगाथा’ हे पुस्तक पडले, ते वाचून तो इतका प्रभावित झाला की बालगंधर्वांचा ग्रेटनेस आणि दैवी गाणं होतं, त्यांनी जे संगीतात सुवर्णयुग निर्माण केलं, त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे, नव्या पिढीला त्यांचे सांगीतिक योगदान उमजले पाहिजे अशा उद्देशाने त्याच्या मनात यावर चित्रपट व्हायला पाहिजे असे वाटले. गंधर्वांवर चित्रपट होणे हे आजच्या काळात खूप गरजेचे होते, नाट्यसंगीताची जी वैभवशाली परंपरा आहे ती चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणे हा खूप वेगळा भाग होता. नॉर्मल मैफिलीतून गाण्यापेक्षा चित्रपटातून ते लोकांसमोर येणे त्याला एक वेगळाच पैलू होता. या प्रोजेक्टमध्ये आपलादेखील सहभाग आहे याचा खूप आनंद झाला, पण थोडे टेन्शनही आले. गंधर्वांची गायकी किंवा त्यांची गाणी मी म्हणत होतो, पण मैफिलीत सादर करणं आणि चित्रपटाला आवाज देणं याच्यात खूपच फरक आहे.सुबोध भावेचे बालगंधर्व चित्रपट करायचे नक्की झाल्यावर चित्रटपटाला नितीन देसाईसारखा चांगला निर्माता मिळाला. महेश लिमयेसारखा चांगला सिनेमॅटोग्राफर, रवी जाधवसारखा चांगला दिग्दर्शक मिळाला, ही टीम सगळी जमा होत गेली. गाण्याची बाजू सांभाळण्यासाठी कौशल इनामदारसारखा संगीतकार होता. आदित्य ओकसारखा सहसंगीतकार होता, विक्रम गायकवाडसारखा रंगभूषाकार होता. अशी सगळी भट्टी छान जमून आली. खरं तर, सुबोधची आणि माझी आधीपासून चांगली ओळख होती आणि त्याने मला हा विषय आधी सांगून ठेवला होता की, तुला या चित्रपटात गायचे आहे. नंतर मग जेव्हा ते कॉन्क्रिट झालं तेव्हा कौशल आणि आदित्य माझ्याकडे आले, मग आम्ही माझ्या आवाजातले सॅम्पल रेकॉर्डिंग करून घेतले. कारण बालगंधर्वांच्या रेकॉर्ड्स वापरणे तसे शक्य नव्हते. या रेकॉर्डिंग्सचे तंत्र तसे जुने असते, त्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या रेकॉर्डिंग्सपेक्षा नवीन कुणीतरी गाणेच आवश्यक होते. शिवाय सुबोधला तो आवाज सूट होणेही गरजेचे होते, म्हणून मग माझ्या आवाजात सॅम्पल रेकॉर्डिंग करून घेतले. गंधर्वांच्या सगळ्या गाण्यांना मी प्लेबॅक देणार हे नक्की झाले. चित्रपटात सुबोध अॅक्च्युअल बालगंधर्वांच्या व्यक्तिरेखेत दिसणार होता. त्याला आवाज देणं हा खूप वेगळा अनुभव होता.पडद्यावर गाणं सूट होऊन लोकांच्या ते पसंतीस पडायला पाहिजे. शिवाय प्रत्यक्ष मैफिलीत नाट्यसंगीत गाणं आणि चित्रपटासाठी ते रेकॉर्ड करणं यातही आॅडिओ दृष्टीने भिन्नता आहे. या विशिष्ट बाबतीत कौशल्य आणि आदित्यचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. हल्लीच्या चित्रपटात विशिष्ट प्रकारचे संगीत ऐकायची सवय झालेली असते म्हणजे डॉल्बी सिस्टीम असतात, त्या विशिष्ट प्रकारच्या साउंडमधूनही नाट्यसंगीत नीट ऐकू आले पाहिजे. तरच ते अपील होणार आहे. जशी गायकी महत्त्वाची होती तशा टेक्निकल गोष्टीही आवश्यक होत्या. उदाहरणार्थ, त्यात बॅकग्राउंड वाद्यं कुठली वापरली गेली किंवा नुसतं आॅर्गन तबल्यावर हे गाणं झालेलं नाही तर वेस्टर्न वाद्यंही त्यात वापरली गेली, त्यांना बॅलन्स असा ठेवायचा होता की वेस्टर्न वाद्यं जरी वापरली तरी परंपरा सोडायची नव्हती, हा महत्त्वपूर्ण घटक होता. त्या वेळी जी वाद्यं वापरली जायची ती सिमिलर वेस्टर्न वाद्यं असायची. सारंगी, व्हायोलिन, सगळे स्ट्रिन सेक्शन वापरले गेले ते त्या प्रकारचे वापरले गेले. नंतर व्हायब्रो फोनसारखे वाद्य वापरले गेले, ज्याच्यामुळे गाण्याला अतिरिक्त भरणा मिळतो. शिवाय आपली वाद्येही वापरली गेली, आॅर्गन, सारंगी आणि वीणा, पखवाज असा वाद्यमेळ जमून आला. पण त्याबरोबरच परंपरा सोडायची नव्हती म्हणजे ड्रमसेट वापरून चालणार नव्हते. ते अगदीच वेगळेच वाटले असते. या सगळ्याचा समतोल साधायचे काम कौशल आणि आदित्यच्या टीमने केले. त्यामुळे नाट्यसंगीत हे नाट्यसंगीत वाटले, परंतु नवीन प्रकारच्या आताच्या साउंडमध्येच ते पेश झाल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले.कौशलने तीन गाण्यांना नव्याने संगीतही दिले. ‘चिन्मया सकल हदया’, ‘आज मारे घर पावना’ आणि ‘परवर दिगार’. शेवटी नमन नटवरा जिथे येते त्याच्यानंतर ‘असा बालगंधर्व न होणे’ या गदिमांच्या ओळी आहेत, त्यालाही कौशलचे नवीन संगीत आहे. साडेतीन गाण्यांना त्याने नवीन संगीत दिले आहे. त्यामुळे जशी गायकी महत्त्वाची होती तशी त्या चित्रपटाचे संगीतही तितकेच महत्त्वपूर्ण होते. दुसरे म्हणजे चित्रपटाचे रेकॉर्डिंग हे ट्रॅक्सवर करावे लागते. मग वाद्ये वेगळी वापरणे शक्य असते. चित्रपटाची गाणी अशी असतात, की बरेच वेळेला वाद्ये आधी वाजली जातात मग गायक येऊन गाऊन जातो. पण नाट्यसंगीतात हे शक्य नाही. ते लाइव्ह गायचे गाणे आहे. त्याच्यात गायकाला स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. मध्येच दोन आवर्तने आहेत आणि तेवढ्या तालात आलाप घ्यायला जागा आहे, असे सांगून ते नैसर्गिकपणे येत नाही. त्यामुळे याचे रेकॉर्डिंग अगदी उलट पद्धतीने केले म्हणजे आधी नुसता आॅर्गन मग तंबोऱ्याचा सूर आणि एक तबल्याच्या ठेक्याचा एक लूप निश्चित करण्यात आला. ते हेडफोन्सवर घेऊन मी मुक्तपणे आधी गायलो. व्हेरिएशन नंतर घेतली गेली. मैफिलीत जशी गातो तशी ती गायली. मग नंतर चित्रपटाच्या वेळेनुसार कुठे किती वेळात घेण्यात येणे शक्य आहे त्याच्यावर काम केले गेले. रेकॉर्डिंग ते बॅकग्राउंड या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या आणि नाट्यसंगीत सर्वांपर्यंत पोहोचू शकले. याचा एक फायदा असा झाला की तरुण पिढीपर्यंत नाट्यसंगीत पोहोचले. त्यांना आताच्या साउंडमध्ये ते ऐकता आले. ही संगीताच्या प्रसारासाठी खूप चांगली गोष्ट घडली. तरुण पिढीपर्यंत नाट्यसंगीत पोहोचल्यामुळे उद्दिष्टदेखील साध्य झाले.बालगंधर्वांची महती हा खूप संवेदनशील विषय. स्त्रीवेशभूषेचे आव्हान पेलत तो मान राखण्यात सुबोधही यशस्वी झाला. अप्रतिम भूमिका त्याने साकारली. बालगंधर्वांसाठी हा चित्रपट करतोय अशी भावना संपूर्ण टीमच्या मनात होती. त्यांची जी महती आहे त्यांना आपल्याकडून धक्का लागू नये याच जाणिवेतून ही कलाकृती साकार झाली. त्यामुळे आम्ही विविध क्षेत्रांत काम करीत असलो तरीआमच्यातील बॉण्ड घट्ट राहिला आहे. आजही आम्ही भेटलो की सगळ्या आठवणी जाग्या होतात. वैयक्तिक माझ्यासाठी हा चांगला योग जुळून आला. लहानपणी बालगंधर्वांची गाणी गाऊनच आम्ही मोठे झालो आणि बालगंधर्व चित्रपटात सहभागी होता आले. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला, बालगंधर्व आणि आपले नाट्यसंगीत या चित्रपटाच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचले याचे समाधान आहे.
(शब्दांकन - नम्रता फडणीस)(लेखक प्रसिद्ध गायक आहेत.)