ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ - गांधीतीर्थ जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेच्या अनोख्या उद्घाटनासाठी भारतासह 23 देशातील महिला प्रतिनिधींनी सोबत आणलेल्या मातीचे एकात्मरूप साधले गेले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, परिषदेच्या समन्वयिका जिल कार-हैरीस, मार्गारेट होगेनटोवियर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी.व्ही. राजगोपाल, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुदर्शन अयंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. जॉन चेल्लादुराई व परिषदेत सहभागी महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
२३ फेब्रुवारी २०१६ रोजी या परिषदेच्या अंतिम रुपरेषेसाठी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समवेत बैठक ठरविण्यात आली होती. या बैठकीसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स अण्ड पीस मदुराई यांच्या प्रमुख प्रतिनिधींसह जिल कार-हैरीस, पी.व्ही. राजगोपाल आले होते. तथापि भवरलालजी जैन प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल असल्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुरवातीपासूनच्या नियोजनात त्यांनी दिलेल्या योगदानाला अधोरेखित करण्यासाठी संयोजकांनी परिषदेच्या उद्घाटनासाठी देश-विदेशातील मातीला एकत्र करून त्यावर भवरलालजींच्या स्मरणार्थ गांधी तीर्थपरिसरात वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते गांधीतीर्थच्या परिसरात ज्या ठिकाणी वटवृक्ष लावला गेला त्याच्या समोर या स्मृतिवृक्षाचे रोपण करण्यात आले.