मनीषा म्हात्रे / मुंबईपोलीस खात्यातील रूक्ष आणि तणावग्रस्त जीवन जगत असताना आपला छंद सांभाळणे आणि त्याच्यासाठी वेळ देणे हे पोलिसांना कधी शक्य नसते. अशात बाबांची पुस्तक लिहिण्याची राहिलेली अपूर्ण इच्छा तसेच पोलिसांबाबतच्या बदलत चाललेल्या काळाची आठवण करून देण्यासाठी एका एसीपीच्या मुलीने बाबांच्या आठवणी पुस्तकरूपात साठवून पोलिसांना भेट म्हणून दिली आहे.नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास जागता पहारा देणारा ‘पोलीस’ हाही एक माणूसच आहे, हे आपण बहुतेक वेळा विसरून जातो. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक संकटे त्याच्यासमोर येत असतात. अनेक मोहाचे क्षण गुंगवून टाकतात. राजकारणी, समाजातले प्रतिष्ठित, श्रीमंत यांच्यापुढे अनेकदा लाचारी पत्करावी लागते. गुन्हा, गुन्हेगार, सामान्य जनता यांच्यामध्ये काम करताना मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना घडतात. गुन्हेगार माहीत असूनही त्याला शासन करणे शक्य होत नाही तेव्हा उद्वेग होतो. पण या तमाम अडचणीतूनही आपल्या कर्तव्याचे सतत भान ठेवून त्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत राहतात. हे सगळे करत असताना त्याच्या कुटुंबाकडे स्वत:कडे तो नेहमीच दुर्लक्ष करत राहतो. हे सगळे करत असताना त्याच्यावरील हल्ल्यांचे सत्रदेखील सुरूच आहे. त्याच्या व्यथा मांडण्यासाठी पोलीस पत्नी रस्त्यावर उतरल्या.असेच भोईवाडा परिसरात राहत असलेल्या भावना पेडणेकर हिचे बाबा विजय राजाराम पेडणेकर. १९४१मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. पायधुनी, वांद्रे, वरळी, वाहतूक, सामान्य शाखा, एन.एम. जोशी, विमातळ सुरक्षा, सहार, खार आणि दादर पोलीस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली. १९९१मध्ये ते दादरमधून एसीपी म्हणून निवृत झाले. गेल्या वर्षी २३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पेडणेकर कुटुंबाला धक्का बसला. मात्र पुढे काय? याच बाबांच्या खाकीतील वेचक आठवणी तिने पुस्तकात मांडण्याचे ठरवले. पेडणेकर यांना पुस्तक लिहिण्याची इच्छा होती. मात्र सेवेत असताना कामादरम्यान तर निवृत्तीनंतर समाजसेवेमुळे त्यांना वेळ मिळाला नाही. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवसापासून तिने पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या शेकडो जणांच्या तिने भेटीगाठी सुरू केल्या. पोलीसमित्र, जुनी वृत्तपत्रांची कात्रणे, फोटोंची जमवाजमव केली. त्याची वस्तुस्थिती ‘खाकी वर्दीतील वेचक आठवणी’ या पुस्तकात मांडली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच तिने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटलेले बाबा कसे होते हे त्यांच्याच शब्दांत व्यक्त केले आहे. कामावरून दमून घरी आलेल्या बाबांचे किस्से, त्यांनी केलेल्या विविध गुन्ह्यांचा उलगडा तिने या पुस्तकात मांडला आहे. कामातून वेळ काढत कधीतरी त्यांनाही भेटलेल्या बाबांच्या सहवासाची ऊबही पुस्तकातून पुढे जाणवते. गुन्ह्यांचा तपास करताना मिळालेले यश, त्यावर झालेल्या पुरस्कारांच्या वर्षावाचा उल्लेख तिने या पुस्तकात केला आहे. हे सारे मांडत असताना पूर्वीचा दरारा आता कुठे तरी कमी झाला आहे, याची खंतही ती व्यक्त करताना दिसते आहे. सध्या हेच पुस्तक घेऊन ती मुंबईतल्या प्रत्येक पोलिसाला मोफत भेट म्हणून देत आहे. आतापर्यंत तिने पोलीस आयुक्तांसह ५० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे पुस्तक मोफत भेट म्हणून दिले. तिच्या या प्रयत्नांनी भारावलेल्या पोलिसांकडून कुठे तिचा सत्कार होतोय तर कुठे तिच्यावर शाबासकीची थाप पडताना दिसते आहे.
पुस्तकरूपात साठवल्या पोलीस बाबाच्या आठवणी
By admin | Published: March 22, 2017 1:49 AM