नाशिक : बलात्कारपीडित महिलांची कौमार्य चाचणी वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जाते. ती कशी घ्यावी, याविषयीचा उल्लेखही वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमात होता. हा विषय अखेर अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फिंगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय असल्याचा दावा करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नसल्याचा आक्षेप नोंदवित कौमार्यता हा खूपच वैयक्तिक विषय असून, कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र पाठवून वरील निर्णय कळविला आहे.
आता राष्ट्रीय स्तरावर लढाजातपंचायतकडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर अंनिसच्या पुढाकारामुळे बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी अंनिसने केली होती. आता राष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिलच्या अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंनिसचे अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.