नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना लिलावगृहात जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यांचे नुकसान करण्यासाठी लिलावगृहाच्या तीनही बाजूने अनधिकृतपणे अवजड वाहने उभी केली जात आहेत. ग्राहकांना ये - जा करण्यासाठीही अडथळा होत असून मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीने कांदा मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना २००८ मध्ये गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यास बंदी घातली. सर्वांनी लिलावगृहात व्यवसाय करण्याची अट घातली. सुरवातीला सर्व व्यापारी लिलावगृहात आले. परंतु त्यामधील बहुतांश जणांनी पुन्हा अनधिकृतपणे गाळे भाड्याने घेवून व्यापार सुरू केला आहे. यामधील अनेकांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत, तरीही प्रशासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. जे बिगरगाळाधारक प्रामाणिकपणे लिलावगृहात व्यवसाय करतात त्यांना अडचणीत आणले जात आहे. लिलावगृहाच्या तीनही बाजूला अनधिकृतपणे अवजड वाहने उभी केली जात आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे मार्केटमध्ये माल घेवून येणारी वाहने तत्काळ खाली करून बाहेर गेली पाहिजेत. परंतु कांदा मार्केटमध्ये अनेक वाहने ८ ते १० दिवस एकाच ठिकाणी उभी असतात. अनधिकृत वाहनतळाचे स्वरूप मार्केटला आले आहे. लिलावगृहाला लागून वाहने उभी असल्याने ग्राहकांना लिलावगृहात जाता येत नाही. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने अनेकांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागला आहे. उर्वरित व्यापाऱ्यांनाही येथून गाशा गुंडाळून लावण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जावू लागले आहेत. बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांनी वारंवार अनधिकृत वाहनतळाची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. परंतु या तक्रार अर्जांना केराची टोपली दाखविली जात आहे. लिलावगृहामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा असेल तरच वाहने हटविली जातात. याव्यतिरिक्त कोणी कितीही तक्रारी केल्या तरी वाहने बाजूला केली जात नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला लिलावगृहात जागा देवून आमचा व्यवसाय बंद पाडण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली आहे. बाजार समिती प्रशासनाने तत्काळ अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)बिगरगाळाधारकांवर अन्याय प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासन वारंवार अन्याय करत आहे. बाजार समितीने दिलेल्या आदेशाप्रमाणे व्यापाऱ्यांनी लिलावगृहात व्यापार सुरू केला. परंतु ज्यांनी अनधिकृतपणे गाळ्यात व्यवसाय सुरू ठेवला त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. लिलावगृहातील व्यापाऱ्यांच्या जागेसमोर वाहने उभी करून ठेवली जात आहेत. तक्रार केली तरी कोणीच लक्ष देत नसल्याने अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लिलावगृहातील व्यापाऱ्यांची अडवणूक सुरू
By admin | Published: June 11, 2016 2:51 AM