मुंबई : उत्तर भारताच्या टोकावर होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी, मुंबईसह महाराष्ट्र गारठला असून, महाबळेश्वरवर हिमदुलई पसरली आहे. थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा पडलेल्या थंडीदरम्यान आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान असून, घटत्या किमान तापमानामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.विशेषत: दिवसाच्या तुलनेत रात्री वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग अधिक आहे. परिणामी, मुंबई शहरासह उपनगरातील गारव्यात वाढ झाली आहे. बुधवारसह गुरुवारीही मुंबईचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, मुंबईतली हुडहुडी आणखी काही दिवस कायम राहणार असल्याने मुंबईकर चांगलेच गारठणार आहेत. (प्रतिनिधी)मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने घट नोंदवण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान १४ ते १६ अंशाच्या घरात नोंदवण्यात येत आहे.विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मुंबईत पारा १३.६ अंशावर
By admin | Published: January 11, 2017 5:06 AM