मुंबई : चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी गारांचा मारा सुरू असून, मराठवाड्यासह विदर्भात सातत्याने गारांसह पाऊस पडत असून, २ मे रोजी विदर्भातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या शहरांचे कमाल तापमान अद्याप ४० अंशावर नोंदवण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने ३५ अंश नोंदवण्यात येत होते. आता मात्र, मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली आहे. मुंबईचे कमाल ३३ अशांवर घसरले आहे.दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात दोन अंशाची घसरण झालीआहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी तापमानात घसरण होऊनही येथे उष्ण आणि कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. शिवाय उकाडाही कायम आहे. वाहणाऱ्या या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर घामाघूम होत असून, मंगळवारसह बुधवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर
By admin | Published: May 02, 2017 5:11 AM