संताेष मगर तामलवाडी (जि. उस्मानाबाद) :
एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे. जीव मुठीत घेऊन ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत यमगरवाडी येथील शाळा गाठावी लागत हाेती. हा प्रश्न ‘लाेकमत’ने रविवारच्या अंकात मांडला असता, त्याची थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दखल घेतली. सचिव श्रीकर परदेशी यांनी स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अन् हे पथक सकाळीच गावात दाखल झाले. थाेडाही विलंब न करता पथकाने अहवालही सादर केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडीत चाैथीपर्यंतच शिक्षणाची साेय आहे. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना यमगरवाडी येथे जावे लागते. काेरेवाडी ते यमगरवाडी या दाेन्ही गावांमध्ये अवघे दाेन ते अडीच किलाेमीटर एवढेच अंतर आहे. परंतु, गावाला लागूनच भलामाेठा ओढा आहे. हा ओढा तलावाच्या पायथ्याशी असल्याने नेहमी पाणी असते. पाऊस पडल्यानंतर पूर येताे. अशा पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. ओढ्यावर पूल उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची ही जीवघेणी कसरत ‘लाेकमत’ने मांडली. या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने घेतली.
तातडीने दिला ९ पानी अहवाल : सचिव श्रीकर परदेशी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘लाेकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासह मेसेज धाडत स्वतंत्र पथक पाठवून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हा आदेश धडकताच समग्र शिक्षण विभागाचे कार्यकारी अधिकारी आर. बी. राऊत, विस्तार अधिकारी मल्हारी माने यांचे पथक थेट गावात दाखल झाले. ग्रामस्थांसह पालकांना साेबत घेऊन ओढ्याच्या ठिकाणी गेले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. थाेडाही विलंब न करता जवळपास ९ पानी अहवाल त्यांनी वरिष्ठांना सादर केला आहे.