मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमाशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, दुपारपासून राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये असल्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. तसेच एका कामाच्या निमित्ताने बबनदादा शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना अजित पवार म्हणाले की, बबनदादा शिंदे हे भाजपात जाणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती. मात्र आता आमची बैठक सुरू असतानाच आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बबनदादांचा फोन आला. काही कामाच्या संदर्भात भेटायला आलो होतो, असे त्यांनी सांगितले. बबनदादांचे दिल्लीतही कारखाने आहेत. त्यांची इतर पण महत्त्वाची कामं असतात, असे अजित पवार म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते, त्याचे वेगळे अर्थ काढणे योग्य नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मीसुद्धा उपमुख्यमंत्री होतो. तेव्हा भाजपाचे खासदार आमदार मला भेटायला याचचे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे असतात. आम्हीही भेटायला जातो. पण आम्ही कुठे गेलो काय. बबनदादा हे कामाच्या संदर्भात फडणवीसांना भेटले, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या दोघांच्या हाती काही आहे, असं वाटत नाही. यांना दिल्लीत जाऊन तिकडून हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाहीत असं चित्र दिसतंय, असे अजित पवार म्हणाले.