पुणे : आज (१४ डिसेंबर) रात्री आपल्याला अवकाशीय आतषबाजी दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये मिथुन तारका समूहातून उल्का येताना दिसतील. भारतीय वेळेप्रमाणे रात्री साडेअकराच्या सुमारास हा वर्षाव दिसण्याची शक्यता आहे. यातही एका तासात सुमारे ७० उल्का मिथुन तारकासमूहातील कॅस्टर या ताऱ्याच्या दिशेकडून येताना दिसण्याची शक्यता आहे. रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंत याचा कालावधी असेल. आपल्या सौरमालेत फिरत असलेला एखादा धूलिकण जेव्हा अतिवेगाने आपल्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील घटकांशी त्याचे घर्षण होते आणि इतकी ऊर्जा निर्माण होते की तो अक्षरश: पेट घेतो आणि आपल्याला उल्का म्हणून दिसतो. जेव्हा एखादा धूमकेतू सूर्याची परिक्रमा करताना सूर्याजवळून जातो तेव्हा त्याच्या काही भागाचे तुकडे होतात. हे बारीक बारीक तुकडे किंवा कण धूमकेतूसारखेच सूर्याची परिक्रमा करीत असतात. जर त्या धूमकेतूच्या कक्षेस पृथ्वीची कक्षा छेदत असेल तर जेव्हा जेव्हा पृथ्वी त्या छेदबिंदू वर येते तेव्हा या कणांचा पृथ्वीवर माराच होतो आणि आपल्याला एक प्रकारे उल्कांचा वर्षाव दिसतो. ज्या तारकासमूहातून अशा उल्कावर्षाव होताना दिसतो त्या तारकासमूहाच्या नावाने तो उल्कावर्षाव ओळखण्यात येतो. याविषयी मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले, मिथुन तारकासमूहाचा हा वर्षाव एकेकाळी धूमकेतू असलेला पण आता लघुग्रह झालेल्या फेथॉन याच्या धुरळ्यामुळे होतो. या उल्कावर्षावाची खासियत हीच की दरवर्षी सातत्याने यामुळे आपल्याला ताशी सुमारे ७० उल्का दिसतात. या वर्षी भारतातून हा वर्षाव खूप चांगला दिसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)हा उल्कावर्षाव बघण्यास काय काय लागेल?फक्त चांगली दृष्टी उल्कावर्षाव बघण्यास पुरेशी आहे. उल्का आकाशात फार दूरपर्यंत जातात त्यामुळे नुसत्या डोळ्यांनीच यांना बघणे केव्हाही चांगले. पण त्यांच्या निरीक्षणासाठी तुम्हाला थंडीत रात्री बाहेर जावं लागणार आहे. तर तुमच्याजवळ चांगले गरम कपडे हवेत. उल्कावर्षाव ही आरामात बघण्याची गोष्ट आहे. तुमच्याकडे एखादी आराम खुर्ची असेल तर तिचा फार उपयोग होतो. हा वर्षाव पाहण्यासाठी गाव, शहरापासून दूर अंधाऱ्या जागेत जाणं केव्हाही चांगलंच पण तरीही शहरात थेट डोळ्यांवर सरळ प्रकाश पडणार नाही, अशी जागा निवडावी.
सोमवारी रात्री होणार उल्कावर्षाव!
By admin | Published: December 13, 2015 11:58 PM