नंदुरबार : पैसेवारी ठरविण्याची पद्धत ब्रिटीशकालीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमीच तक्रारी असतात. आता सर्वसमावेशक पद्धत ठरविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याची माहिती महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिली.सरदार पटेल शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यंदा पैसेवारीबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे काही भागात दुष्काळी स्थिती असूनही पैसेवारीमुळे जाहीर करता आलेली नाही. त्यामुळे ब्रिटीशकालीन पद्धत बदलण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल येताच पुढील खरीप हंगामापासून नवीन पद्धतीने पैसेवारी लावली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. परंतु त्यावरही राजकारण केले जाते. शेतकरी आत्महत्या होऊच नये यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांप्रमाणे आता पालक सचिवांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले. (प्रतिनिधी)
पैसेवारी ठरविण्याची पद्धत बदलणार - खडसे
By admin | Published: January 05, 2015 4:26 AM