मुंबई : काळा पैसा, भ्रष्टाचार आणि नकली नोटांविरोधातील लढाई याबाबतीत आम्ही सरकारच्या बाजूनेच आहोत. मात्र ज्याच्या विरोधात लढाई आहे, त्यांनाच लक्ष्य करायला हवे. नोटाबंदीचा सरकारचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची पद्धतही चांगली हवी, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवाजी पार्क येथील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. नोटाबंदीमुळे देशभर सामान्य लोकांच्या ज्या हालअपेष्टा सुरू आहेत त्या अशाच चालू राहिल्या तर देशात अराजक निर्माण होईल, असे आपण राजनाथ सिंह यांना सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदी विरोधात काढलेल्या मोर्चात शिवसेना सहभागी झाली होती. यानंतर राजनाथ सिंह यांनी उद्धव यांना बुधवारी रात्री दूरध्वनी केला होता. (प्रतिनिधी)
हेतूबरोबरच पद्धतही चांगली हवी - उद्धव
By admin | Published: November 18, 2016 5:50 AM