पुणे : सोशल मिडीयावरून हॅशटॅग मी टू चळवळीला सुरूवात झाल्यानंतर सिंम्बायोसिसच्या विमाननगर कॅम्पस येथील सेंटर फॉर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील आजी व माजी विद्यार्थिनींनी त्यांना आलेले अनुभव मांडले होते. सिंम्बायोसिस प्रशासनाने या तक्रारींची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशीनंतर सेंटर फॉर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील दोघा प्राध्यापकांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर यापूर्वीच या विभागाच्या संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत.
विजय शेलार आणि सुहास घाटगे अशी निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत. संचालक अनुपम सिध्दार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मी टू चळवळ सुरू झाल्यानंतर सोशल मिडीयावरून सिंम्बायोसिसच्या काही विद्यार्थींनीनी त्यांना शिकविण्यासाठी येणाऱ्या प्राध्यापकांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर याप्रकरणी त्यावेळी कॉलेजच्या प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर त्यांना इंटर्नशीपच्या ठिकाणी आलेले लैंगिक शोषणाचे अनुभव मांडले होते. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सिंम्बायोसिसकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती, या चौकशीनंतर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
एका विद्यार्थींनीने केलेल्या व्टिटमध्ये सांगितले होते की, ‘माझी मैत्रीण ज्या ठिकाणी इंटर्नशीप करत होती, तिथे तिच्या बॉसनं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कॉलेज प्रशानाला याबाबत कळवल्यावर त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही, उलट ती मुलगी कशी चुकली असेल हे दाखवून देण्याकडेच त्यांचा कल होता.’ लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थींनीला धीर देण्याऐवजी ‘तू अंमली पदार्थांचे सेवन करतेस का’ अशी विचारणा प्राध्यापकांकडून करण्यात आल्याची तक्रार एका विद्यार्थीनीने केली होती.
आम्हांला शिकविण्यासाठी येणाऱ्या सर्वात सिनियर प्राध्यापकाने अनेकदा आमच्यासमोर आक्षेपार्ह विधानं केली आहेत. एका मुलीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणाविषयी बोलताना काही प्राध्यापकांनी फारच खालची पातळी गाठली होती. याबाबत कुठे तक्रार करायची याबाबत काहीच माहिती नव्हती अशी तक्रार विद्यार्थींनीनी केल्या आहेत.
सिंम्बायोसिसच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत याप्रकरणी मोठी मोहीम उघडली आहे. ‘आम्हाला इंटर्नशीपच्या ठिकाणी आलेल्या वाईट अनुभवांची किंवा आम्हाला शिकवणाºया प्राध्यापकांनी केलेल्या गैरवर्तणुकीची दखल गांभीर्याने घेण्यात यावी’ अशी मागणी त्यांनी केली आहे. महाविद्यालयामध्ये विश्वास ठेवता येतील असे मानसोपचार तज्ज्ञ असावेत, त्यांच्याकडे करण्यात येणाऱ्या तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.