- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे दुग्ध वसाहतीमधील मेट्रो-३ कारडेपोसाठी हस्तांतरित करण्यात आलेली जागा रिलायन्सच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे बाधित होत होती. परिणामी, सदर विद्युत वाहिनी व पायलॉनच्या स्थलांतरणाकरिता आवश्यक असलेली आरे दुग्धवसाहतीमधील परजापूर येथील ७ हजार २०० चौरस मीटरची जागा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वनविभागाकडे प्रत्यार्पित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा भुयारी मेट्रो-३ मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी आरेमधील परजापूर येथील २९.२७ हेक्टर जागेचा ताबा कारशेडसाठी कॉर्पोरेशनला महसूल आणि वन विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र, कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेली जागा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे बाधित होत आहे. परिणामी, विद्युत वाहिन्या आणि पायलॉन्स संबंधित ठिकाणाहून स्थलांतरित करणे आवश्यक आहे, असे म्हणणे कॉर्पोरेशनने मांडले होते. यावर जागा हस्तांतरित करण्याबाबतची मान्यता वनविभागाकडून देण्यात आली आहे.