- दीप्ती देशमुख, मुंबई
मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रिजेन्सी हॉटेल यांच्यातील जमिनीच्या वादामुळे कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो-३ प्रकल्प खोळंबला होता. मात्र मुंबई विमानतळ, रिजेन्सी हॉटेल आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल) मध्ये सामंजस्याने तोडगा निघाल्याने मेट्रो-३चा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ्यानंतर मेट्रो-३चे काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विमानतळ आणि रिजेन्सी हॉटेलमध्ये ३१,००० चौ. मी. भूखंडावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र याच भूखंडातील एमएमआरसीएलला १४,३०४ चौ.मी. भूखंड भुयारी रेल्वेचे काम करण्यासाठी पाच वर्षांकरिता तात्पुरत्या स्वरूपी हवा आहे. तर १९६ चौ.मी. भूखंड व्हेंटिलेशन शाफ्ट, एन्ट्री, एक्झिट आणि फायर एक्झिटसाठी हवा आहे. त्यासाठी या दाव्यामध्ये एमएमआरसीएलने नोटीस आॅफ मोशन दाखल केले. यावरील सुनावणी न्या. एस.जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे होती.कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो-३ प्रकल्प ३३ कि.मी. लांबीचा आहे. विमानतळाजवळील टर्मिनस- २ येथून १२ कि.मी. जमिनीखालून मेट्रो धावणार असल्याने रिजेन्सीने येथे आपल्याला पार्किंगसाठी तळघर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी भीती उच्च न्यायालयाकडे व्यक्त केली.परंतु, सोमवारच्या सुनावणीत एमएमआरसीएलच्या वकील किरण बघालिया यांनी एमएमआरसीएल पार्किंगसाठी तळघर बांधण्यास आक्षेप घेणार नाही. पण मेट्रो लाइनच्या सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या निकषांच्या अधीन राहूनच परवानगी देण्यात येईल, अशी हमी न्यायालयाला दिली. तसेच ज्याला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जमिनीचा ताबा मिळेल, त्याला नुकसानभरपाईची रक्कम देण्याची तयारी एमएमआरसीएलची आहे, अशीही माहिती अॅड. बघालिया यांनी न्यायालयाला दिली.मुंबई विमानतळ प्राधिकरण, रिजेन्सी हॉटेल आणि एमएमआरसीएल यांच्यामध्ये या मुद्द्यांवरून एकवाक्यता झाल्याने अखेरीस उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलचे नोटीस आॅफ मोशन निकाली काढत मेट्रो-३चा मार्ग मोकळा केला. मेट्रो-३ कुलाबा ते सीप्झ धावणार असून, यामुळे दक्षिण मुंबई थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. एकूण २७ स्टेशन्स प्रस्तावित असून, तीन स्टेशन्स विमानतळाच्या परिसरातच असणार आहेत. (प्रतिनिधी) दक्षिण मुंबई विमानतळाला जोडली जाणारमेट्रो-३मुळे दक्षिण मुंबई थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. एकूण २७ स्टेशन्स प्रस्तावित असून, तीन स्टेशन्स विमानतळाच्या परिसरातच असणार आहेत. उच्च न्यायालयाने मेट्रो-३ला हिरवा कंदील दाखविल्याने पावसाळ्यानंतर या प्रकल्पास सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली