मुंबई : मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही; तर ३५० झाडे तोडावीच लागणार. तरीही हा प्रकल्प पर्यावरण आणि प्रदूषण कमी करणारा ठरणार आहे. मी मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल करून निवृत्तीनंतर नागपूरला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.झाडे वाचविण्यासाठी दलदलीची पर्यायी जागा घ्यावी लागणार आणि त्यासाठी दीड हजार कोटींचा अधिक भार पडेल, हा पैसा जनतेच्या खिशातूनच जाणार. त्याचा परिणाम तिकिटावर होईल. त्यामुळे आरेतून मेट्रो ३ जाणे सयुक्तिक आहे. पर्यावरणाचा विचार करता झाडे ही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पण हा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सार्वजनिक परिवहन हा सर्वांत उत्तम मार्ग आणि त्यातही मेट्रो हे सर्वोत्तम माध्यम समजले जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.इतर मुद्द्यांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र ही योजना आम्ही राबवत आहोत. यात एका वर्षात १०० शहरे हागणदारीमुक्त केली आहेत. १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. पुणे आणि सोलापूर वगळता इतर ८ शहरांना निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, केंद्राचा निधीही त्यांनाच देण्यात येणार आहे. ज्या महापालिका सरकारचा निधी घेऊन योजना वेळेपूर्वी पूर्ण करतील त्यांना बोनस निधी दिला जाणार आहे. तर ज्या योजना उशिरा पूर्ण होतील त्यांना आर्थिक दंड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी, वीजप्रकल्पांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पुरविले जाईल. तेच प्रक्रिया केलेले पाणी त्यांनी वापरावे, असे बंधन घातले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)आयव्हीआरसीएलच्या कामांची चौकशी कराकोलकाता येथे आयव्हीआरसीएल कंपनीने बांधलेला एक मोठा पूल कोसळला. या कंपनीच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. आयव्हीआरसीएल कंपनी काही अन्य कंपन्याबरोबर मिळून महाराष्ट्रातदेखील रस्त्यांची आणि अन्य प्रकल्पांची कामे करीत आहे. राज्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केली.
‘मेट्रो ३’ प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार
By admin | Published: April 02, 2016 1:45 AM