मुंबई : मुंबई महागर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणार्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पासाठी डीसी यंत्रणेऐवजी एसी विद्युत प्रवाहावर भर देण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेतला नसला तरी तज्ज्ञांच्या मते डीसीऐवजी एसी हा पर्याय खर्चात तब्बल १५ ते २० टक्के वाढ करणारा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगभरातील ९७ टक्के मेट्रो रेल्वे या डीसी तंत्रज्ञानावर चालविल्या जात आहेत. मात्र तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एसी तंत्रज्ञानावर भर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते एसी तंत्रज्ञानावर मेट्रो चालविल्यास मेट्रो रेल्वेला तब्बल २५ हजार व्होल्ट्सचा भार द्यावा लागेल; शिवाय या कामासाठी ५.८ मीटर उंचीचा बोगदाही खणावा लागेल. त्यासाठी अधिकाधिक विजेचा वापर करावा लागेल. एसीच्या तुलनेत डीसी प्रणालीवर मेट्रो रेल्वे चालविल्यास ती ७ हजार ५०० ते १५ हजार व्होल्ट्सवर चालविली जाईल. परिणामी इंधनाची बचत होईल. शिवाय पर्यावरणाचेही संतुलन राखले जाईल. मुळात दिल्ली मेट्रो ही एसी प्रणालीवर चालविण्यात येत आहे. म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई मेट्रो-१देखील एसी विद्युत प्रवाहावर चालविण्यावर भर देत आहे. मेट्रो-३चा विचार करता तिचा मार्ग ३५.५ किलोमीटर लांबीचा आहे. शिवाय या मार्गावर २७ स्थानके असणार आहेत. त्यातील २६ स्थानके ही भुयारी असणार आहेत. परिणामी या मार्गादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्व मार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे. म्हणून या मार्गावर डीसी विद्युतीकरण उपयुक्त आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
मेट्रोचे विद्युतीकरण महागडे!
By admin | Published: May 13, 2014 3:34 AM