- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दररोज तीन लाखांहून अधिक प्रवाशांना वाहून नेणाऱ्या मेट्रोच्या तिकीट दरात सोमवारी एकाएकी पाच रुपयांची वाढ करण्यात आली. विशेषत: या दरवाढीबाबत प्रवाशांना काहीच कल्पना देण्यात आली नाही. परिणामी, सोमवारी सकाळी तिकीट दरात झालेली वाढ पाहिल्यानंतर प्रवाशांमध्ये संभ्रमासह गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यातच मेट्रोच्या तिकीट दरवाढीवर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने सोमवारी सकाळी मौन बाळगले. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या टीकास्त्रामुळे कंपनीने तिकीट दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मार्गावरील परतीच्या प्रवासासह पासाच्या दरात ही वाढ झाली आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.देशातील अन्य मेट्रोच्या धर्तीवर मुंबई मेट्रोचे तिकीट दर कमी करण्यात आल्याचे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. मेट्रोच्या १०, २०, ३० आणि ४० रुपये या मूळ तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परतीचा प्रवास आणि ४५ दिवसांच्या पासमधील सवलतीमध्ये ५ रुपये कमी केल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते अ़निल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, १४ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीए या दोघांमधील मेट्रो दराच्या मुद्द्यांविषयी सुनावणी आहे. परिणामी, सुनावणीपूर्वी भाडेवाढ लागू करत अप्रत्यक्षरीत्या संबंधितांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. परतीचा प्रवास पाच रुपयांनी महाग झाला असून, मासिक पासमध्येही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लागू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते, असेही गलगली यांनी स्पष्ट केले.मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या तिकिटात पाच रुपयांनी वाढ केली आहे. २ ते ५ किलोमीटर टप्प्यातील प्रवासाच्या तिकिटात १ रुपया ६६ पैसे, तर ५ ते ८ किमी प्रवासाच्या तिकिटात ३ रुपये ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी ट्रिप पासवरील सवलत ५० टक्के होती. आता ८ किमीचा एक टप्पा याप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे, अशा आशयाचे टिष्ट्वट मुंबई मेट्रोने सोमवारी सकाळी अपलोड केले होते. परंतु झालेल्या गोंधळामुळे कंपनीने ते टिष्ट्वट डीलीट केले. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोने मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका केली आहे. विशेषत: मध्य रेल्वेहून पश्चिम रेल्वे गाठणाऱ्या प्रवाशांचा अधिकाधिक वेळ मेट्रोने वाचविला आहे. परिणामी, दिलासा देणाऱ्या मेट्रोच्या तिकीट दरात सोमवारी झालेल्या वाढीमुळे प्रवाशांची अवस्था ‘जोर का झटका धीरेसे लगा’ अशी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या दरवाढीचा परिणाम आता प्रवासी संख्येवर होईल का? हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.मेट्रो वनची आॅफर अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. आज अखेर सोमवारपासून ती पाच रुपयांनी कमी करण्यात आली. वर्सोवा ते घाटकोपर सिंगल तिकीट ४० रुपये होते. त्यानुसार परतीच्या मार्गासाठी ८० रुपये अदा करणे बंधनकारक आहे. मात्र रविवारपर्यंत मेट्रोच्या वतीने केवळ ६० रुपये आकारण्यात येत होते. याचा अर्थ सिंगल प्रवासासाठी ३० रुपये आकारले जात होते. सोमवारपासून या दरात ५ रुपये वाढ करण्यात आली आहे.- प्रवक्ता, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड