मुंबई : पनवेलमधील मौजे कोन येथे बांधलेल्या २,४१७ घरांच्या लॉटरीत घरे मिळालेल्या गिरणी कामगारांसमोर म्हाडाने नुकताच एक विकल्प ठेवला. मौजे कोनमधील घर नको असल्यास त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या घरांच्या लॉटरीमध्ये सहभागी होण्याचा विकल्प म्हाडातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या गिरण्यांच्या जागेवर आधीच टॉवर उभे राहिल्याने ही घरे गिरण्यांच्याच जागेवर मिळतील का? याबाबत गिरणी कामगार आणि त्यांचे वारस संभ्रमात आहेत.न्यू हिंद मिल, स्वान मिल आणि स्वदेशी मिलमधील काही गिरणी कामगारांना २ डिसेंबर २०१६ला मौजे कोनसाठी झालेल्या लॉटरीत घरे मिळाली आहेत. म्हाडाच्या म्हणण्यानुसार, या मिलच्या जागांवर पर्यायी घरे उभारणार असतील आणि त्यासाठी लॉटरीमध्ये या कामगारांना सहभागी करून घेणार असतील तर या तीनही मिलच्या जागांवर याआधीच घरे उभारण्यात आलेली आहेत. त्यामुळे म्हाडा या जागेवर किंवा या घरांच्या आसपास असलेल्या जागांवर घरे उपलब्ध करून देणार आहे का याबाबत म्हाडाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना आपल्या गिरण्यांच्या जागेवरच घरे मिळतील याबाबत संभ्रम आहे.म्हाडाने जाहीर केल्याप्रमाणे मॉडर्न मिल, कमला मिल, खटाव मिल, फिनिक्स मिल, कोहिनूर मिल नंबर १ (एनटीसी), कोहिनूर मिल नंबर २ (एनटीसी), पोद्दार मिल (एनटीसी), मफतलाल मिल नंबर १, मफतलाल मिल नंबर २, मुकेश टेक्सटाईल मिल या गिरण्यांची जमीन म्हाडाला मिळणार नाही असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना म्हाडाच्या नवीन लॉटरीत जिथे कुठे घरे लागतील तिथेच घर उपलब्ध होईल हे स्पष्ट आहे.मुंबईत जवळपास १ लाख ७० हजार गिरणी कामगार आहेत किंवा जे गिरणी कामगार हयात नाहीत त्यांचे वारसदार आहेत. यापैकी अनेक गिरणी कामगार मिल बंद पडल्यानंतर कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाऊन स्थायिकझाले आहेत. मात्र जे गिरणी कामगार किंवा त्यांचे वारसदार अजून मुंबईतच आहेत त्यांच्या घरांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.न्यू हिंद मिल, स्वान मिल आणि स्वदेशी मिल या मिलमधील काही गिरणी कामगारांना पनवेलमधील कोनमधील घरे लॉटरीत मिळाली आहेत. मात्र लॉटरीत मिळालेली ही घरे स्टेशनपासून किंवा वस्तीपासून बरीच दूर असल्याने स्वस्त असूनहीया घरांना घेण्यासाठी हे गिरणी कामगार किंवा वारसदार उत्सुक नाहीत. त्यामुळे म्हाडाने उपलब्ध करून दिलेला हा नवीन पर्याय त्या मिलच्या जागेवर किंवा आसपास असलेल्या जागेवर उपलब्ध असेल तरच फायद्याचा आहे असे या गिरणी कामगारांचे म्हणणे आहे.स्पष्टीकरण देण्याची म्हाडाकडे मागणीम्हाडाने शनिवारी दोन विकल्प आमच्यासमोर ठेवले. मात्र, त्यात काही गोष्टींचा खुलासा होत नाही. न्यू हिंद मिलच्या जागेत किंवा त्याच्या आसपास कोणतीही जागा आता घरे उभारण्यासाठी राहिलेली नाही; मग म्हाडाच्या म्हणण्यानुसार याच जागेवर आम्हाला कशी काय घरे उपलब्ध होणार आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. आम्हाला म्हाडाकडून याबाबत स्पष्टीकरण मिळाले तर बरे होईल. - प्रशांत तांबोळी, गिरणी कामगार वारसदार
पर्यायी घरांचा म्हाडाचा निर्णय : गिरणी कामगारांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:36 AM