मुंबई: नवीन घर घेणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, अव्वाच्या सव्वा किमतीमुळे या ठिकाणी घर घेणे परवडत नाही. परंतू, म्हाडाअंतर्गत अनेकांचे शहराच्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. आता लवकरच म्हाडा नवीन घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.
जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाच्या प्रकल्पाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन माहितीही दिली. 'पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. येत्या दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल,' अशी माहिती आव्हाडांनी ट्विटरवरुन दिली.
पुणे विभागाची सोडतयेत्या दिवाळीत मुंबई विभागात तीन हजार घरांची लॉटरी निघणार आहे. याशिवाय, म्हाडाच्या पुणे विभागासाठी साडेचार हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत निघणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागासाठी 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. यासंदर्भातील जाहिरातही काही दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल.
अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार टाऊनशिप- जितेंद्र आव्हाडदरम्यान, अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वांत मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचे गुरुवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
राज्यातील सर्वात मोठी टाऊनशिपमुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे आव्हाड म्हणाले.