मुंबईत म्हाडा लवकरच मोठी लॉटरी जाहीर करणार आहे. मुंबई मंडळासाठी जवळपास २००० घरांची लॉटरी काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून येत्या १५ दिवसांत याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरु होताच सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात विजेते जाहीर केले जाणार आहेत.
गेल्या वर्षी म्हाडाने ४०८२ घरांची लॉटरी काढली होती. यावेळी 1,00,935 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार जाहिरात बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जुलैच्या एंडिंगला जाहिरात काढली जाईल. यामध्ये गोरेगाव, अँटॉप हिल, दिंडोशी आणि विक्रोळीची घरे असणार आहेत.
लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी सात कागदपत्रांची गरज लागणार आहे. आधीपेक्षा म्हाडाने किचकट असलेली प्रक्रिया खूप सोपी केली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचत आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, शपथ पत्र, जात प्रमाणपत्र आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या वर्गाचे प्रमाणपत्र लागणार आहे.
मुंबईप्रमाणे पुण्यातही म्हाडा लॉटरी जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लॉटरी काढण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील राहणार आहे. मुंबईतील डब्बेवाल्यांनी म्हाडाच्या लॉटरीत १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यामुळे सामान्यांचा कोटा कमी होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या लॉटरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते ५० टक्क्यांनी किंमती वाढण्याची शक्यता आहे. मालाडमध्ये एलआयजीसाठी ७३ लाख तर गोरेगावमध्ये ८६ लाख रुपये किंमत असू शकते. गेल्या वर्षी गोरेगावमध्ये ४५ लाख रुपये किंमत ठेवण्यात आली होती.