चेतन ननावरे, मुंबईधारावी येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मालकीच्या असलेल्या संक्रमण शिबिरातील निवासी गाळा अधिकाऱ्यांनी परस्पर तिसऱ्याच तोतया भाडेकरूला दिल्याचे प्रकरण ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. परिणामी, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर म्हाडा काय कारवाई करणार, असा प्रश्न आहे.विक्रोळी येथील म्हाडा संक्रमण शिबिरातील निवासी गाळा राहण्यायोग्य नसल्याने रहिवासी प्रभावती भांबीड यांनी म्हाडा प्रशासनाला पर्यायी गाळा देण्याची मागणी केली होती. प्रभावती यांचा मुलगा राजेश भांबीड गेल्या तीन वर्षांपासून पर्यायी जागा मिळावी म्हणून प्रशासनाच्या दारी खेटे घालत आहे. मात्र ‘लोकमत’च्या हाती आलेल्या काही पुराव्यांच्या आधारे म्हाडा प्रशासनाने भांबीड यांच्या नावाने दोन वर्षांपूर्वीच निवासी गाळ्याचा ताबा दिल्याचे समजले. भांबीड यांनी कोणतेही ताबा पत्र स्वीकारले नसल्याचा दावा केला आहे. शिवाय भांबीड कुटुंब अद्याप विक्रोळीतील संक्रमण शिबिरातच राहत आहे. त्यामुळे आधीच्या संक्रमण शिबिरातील गाळा रिक्त केला नसताना आणि ताबा पत्र स्वीकारले नसताना म्हाडाने धारावी येथील गाळा एखाद्याच्या ताब्यात दिला तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राजेश भांबीड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, माझगाव येथील बोटावाला चाळ धोकादायक जाहीर केल्यानंतर म्हाडाने त्यांचे पुनर्वसन विक्रोळी येथील संक्रमण शिबिरात केले. पुनर्वसन केलेल्या घरांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे ३१ जानेवारी २०१२ रोजी घराचा स्लॅब कोसळून मुलीचा अपघात झाला. त्यात जबर जखमी झालेल्या मुलीच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्या वेळी घटनास्थळी पंचनामा करणाऱ्या म्हाडाने भांबीड कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नुकसानभरपाई न देता, पर्यायी जागाही देण्यात आली नाही. या प्रकरणाचा खोलात जाऊन पाठपुरावा केल्यानंतर नुकतेच दोन वर्षांपूर्वी म्हाडाचे धारावी संक्रमण शिबिरातील निवासी गाळा दिल्याच्या ताबा पत्राची नक्कल प्रत हाती लागली. आता या प्रकरणी योग्य ते पुरावे घेऊन लवकरच विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे भांबीड यांनी सांगितले.
म्हाडा अधिकाऱ्यांचा प्रताप
By admin | Published: April 20, 2015 3:04 AM