मुंबई : राज्य शासनाने आगामी चार वर्षामध्ये सुमारे ११ लाख घरे उभारण्याचे निर्धारित केले आहे. परंतू म्हाडा एवढ्या मोठ्या संख्येने घरे उभारण्यास सक्षम नाही. यामुळे एसआरए, एमएमआरडीए, धारावी पुर्नविकास प्रकल्प, पीपीएल अशा विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून हे ध्येय गाठता येईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी व्यक्त केला.म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या म्हाडा पत्रकार संघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईसह राज्याचे गृहनिर्माण धोरण अस्पष्ट असल्याने एप्रिलपर्यंत याचा अभ्यास करुन १ मे पर्यंत गृहनिर्माण धोरण निश्चित करण्यात येईल, असेही मेहता यावेळी म्हणाले. म्हाडाच्या यापुर्वीच्या गृहनिर्माण धोरणाबाबत साशंकता व्यक्त करत मेहता यांनी हाऊसिंग स्टॉकच्या प्रस्तावानंतर म्हाडाला किती प्रतिसाद मिळाला, पुनर्विकास प्रकल्प किती रखडले असे सवाल करत प्रिमियम स्विकारण्यास सकारात्मकता दर्शविली. म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारती, संक्रमण शिबीरे अशा विविध पुनर्विकास प्रकल्पााबाबत अभ्यास सुरु असून लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. धारावीतील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. त्या जनमत मागवून पूर्ण करण्यात येतील, असेही मेहता यावेळी म्हणाले. यासाठी पुढील महिन्यात धारावीकरांचे जनमत घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
११ लाख घरांसाठी म्हाडा असमर्थ
By admin | Published: February 27, 2015 2:47 AM