जमीर काझी, मुंबईभ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडामध्ये गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंधासाठी कार्यान्वित असलेल्या दक्षता विभागाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि ‘मलई’ मिळविण्यासाठी असल्याची परिस्थिती आहे. विभागाचे प्रमुख मुख्य दक्षता अधिकाऱ्याचे पूर्णवेळ पद गेल्या १४ महिन्यांपासून तर त्याच्याशिवाय पोलीस दलातील साहाय्यक निरीक्षकाचे पद ३ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे विभागाकडची तपास प्रकरणे,तक्रार कार्यवाहीविना पडून आहेत. भ्रष्टाचाराच्या मूळ दुखण्याबाबत जालीम उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष करीत वरवरची मलमपट्टी करण्यावर प्रशासनाने समाधान मानले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती राज्यभर आहे. म्हाडामध्ये गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला आहे. गरजू नागरिकांना घर मिळवून देणे, तसेच जुन्या इमारतींची पुनर्विकास योजना, ट्रान्झिटमध्ये नंबर लावण्याच्या आमिषाने दलालांनी लुबाडणूक केली आहे. म्हाडातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून ‘रॅकेट’ कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणांतून चव्हाट्यावर आले. या गैरव्यवहाराला प्रतिबंध बसण्यासाठी प्राधिकरणांतर्गत स्वतंत्र दक्षता विभाग सुरू करण्यात आला. त्यामध्ये अखिल भारतीय पोलीस सेवेतील विशेष महानिरीक्षक दर्जाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोन उपअभियंते आणि अन्य अस्थापना वर्गाचा समावेश करून त्यांच्याकडे म्हाडातील सर्व व्यवहाराची देखरेख, प्राधिकरणाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेऊन तपास, दलालांना पायबंद घालणे, विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांकडून झालेल्या फसवणुकीचा छडा लावणे, गैरव्यवहाराच्या प्रकरणात तपासाबाबत पोलिसांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी असते. मात्र डिसेंबर २०१३पासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नाही. तत्कालीन सुरक्षा अधिकारी रामराव पवार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार प्राधिकरणाचे उपमुख्य अधिकारी महेंद्र वारभुवन यांच्याकडे आहे. या ठिकाणी वाचक (रीडर) असणारे साहाय्यक निरीक्षक मिसाळ यांची पदोन्नतीवर गेल्या डिसेंबरला बदली झाली आहे. तेव्हापासून हे पदही रिक्त आहे.
म्हाडाचा दक्षता विभाग वा-यावर
By admin | Published: February 13, 2015 1:56 AM