लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी २०२३) निकाल साेमवारी (दि. १२) राेजी सकाळी ११ वाजता जाहीर हाेणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahacet.org आणि www.mahacet.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या १९ प्रवेश परीक्षांपैकी १७ परीक्षा झाल्या आहेत. त्यांपैकी १६ परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षांना एकूण ९ लाख १३ हजार १६ विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार आहेत.
माेबाइल ॲप्लिकेशनद्वारे उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे, सूचना जागा वाटप याबाबतची माहिती मिळणार आहे, अशी माहिती सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.