सातारा, दि. 3 - येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्यया सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिका-यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिका-याला गाढवावर बसविण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या अर्थपुरवठा करत आहेत. मात्र, त्यांच्या वसुलीची पद्धत महिलांना जेरीस आणणारी आहे. कर्ज घेतलेल्या अनेक महिला हप्ते भरून कंटाळल्या तरी कर्ज फिटत नाही. या परिस्थितीने महिला बेजार झाल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सुरू असणाºया या सावकारीला चाप लावण्यासाठी मनसेचे संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना वसुलीबाबत काही सूचना केल्या आहेत.
मात्र, त्या सूचनांना धाब्यावर बसवून कºहाड तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्या वसुली करत असल्याचा महिलांचा आरोप आहे.मनसेचे मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी शेकडो महिला क-हाड येथील कोल्हापूर नाक्याजवळील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयात धडकल्या. आक्रमक झालेल्या रणररागिणींनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. तर अरेरावीची भाषा करणाºया कंपनीच्या अधिका-याच्या तोंडाला काळे फासले. काही महिलांनी कंपनीच्या कर्मचा-याला कार्यालयाबाहेर असलेल्या गाढवावर बसण्यास भाग पाडले.
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला. पोलिसांनी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. मात्र, तेथेही महिला आंदोलन कर्त्यांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.