रूपेश उत्तरवार,
यवतमाळ- पंतप्रधान सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी केली जात असून या योजनेतील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान घटविण्यात आले आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जात होते. मात्र नव्या योजनेत केवळ ४५ ते ३५ टक्केच अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी २०१२पासून २०१७पर्यंत विदर्भ सघन सिंचन योजना राबविण्यात येत होती. या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी मोठ्या शेतकऱ्यांना ५० टक्के तर लहान शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येत होते. परंतु आता केंद्राने जुनी योजना बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्याऐवजी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून सूक्ष्म सिंचनासाठी असलेल्या अनुदानात ३५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मोठ्या शेतकऱ्यांना ३५ टक्के तर लहान शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. जुन्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी केलेले अर्जही परत करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत.सिंचनाच्या अनुदानासाठी ७०० कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतरही अनेक जिल्ह्याला अनुदान मिळाले नाही. मंगळवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनुदानाचा विषय मांडला जाईल. - संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळविहिरींचे काम पूर्ण करीत आहे. मात्र वीजपुरवठ्याचा प्रश्न आहे. यामुळे जिल्ह्याला जितके उद्दिष्ट आहे तितकेच अनुदान मिळेल. त्यानंतरही काही प्रलंबित राहिल्यास त्याची शहनिशा करून पाठपुरावा केला जाईल.- मदन येरावार, राज्यमंत्री, यवतमाळ