शोधमोहीम सुरु : मे महिन्यापासून लोकेशन नाही वरोरा (चंद्रपूर) : जगात अत्यंत दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्ष्याचा तालुक्यातील शेत शिवारात मागील १० वर्षांपासून अधिवास आहे. हा पक्षी उन्हाळ्यात दिसत नाही. त्यामुळे त्याचे वास्तव्य वेळोवेळी मिळावे यासाठी एका माळढोक पक्ष्याला मायक्रोचिप बसविण्यात आली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे लोकेशन मिळत नसल्याने वन विभागासह पक्षिप्रेमींची चिंता वाढली आहे. २००४ मध्ये वरोरा तालुक्यातील मार्डा गावाच्या शेतशिवारात सहा माळढोक आढळून आले. १० वर्षात या पक्ष्यांच्या संख्येत केवळ चारने वाढ होऊन त्यांची संख्या १० झाली. यातील काही पक्षी भद्रावती तालुक्यातील भटाळी-नंदोरी शेत शिवारात आढळून आले. या पक्ष्याच्या संवर्धनाकरिता वन विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने विविध उपाय योजना राबविणे सुरू केले. जुलै महिन्यात पिकावर येणाऱ्या अळ्या, बेडके, छोटे साप फस्त करीत असल्याने माळढोक शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो. जून ते मार्चपर्यंत या पक्ष्याचे अस्तित्व होते. त्यानंतर ते एप्रिल ते जुलै महिन्यात दिसत नव्हते. त्यांचे अस्तित्व बाराही महिने राहावे याकरिता डेहराडून येथील शास्त्रज्ञांनी एका माळढोक पक्ष्याला मायक्रोचिप लावली. त्यानंतर या पक्ष्यास सोडण्यात आले. एप्रिल महिन्यापर्यंत मायक्रोचिपद्वारे माळढोक पक्ष्याचे लोकेशन मिळत होते. त्यानंतर मे, जून व जुलै महिन्यात लोकेशन मिळणे कठीण झाले. मायक्रोचिप लावलेला पक्षी वरोरा तालुक्यातील भटाळा, कोटबाळा, येन्सा, कोंढाळा या परिसरात आढळून आला. परंतु सध्या त्याचे लोकशन मिळत नाही.
मायक्रोचिप लावलेला माळढोक ‘नॉटरिचेबल’!
By admin | Published: July 24, 2014 12:57 AM