खेड (जि. रत्नागिरी) : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत रासायनिक वायुगळतीची मालिका मागील सहा महिन्यांपासून सुरूच आहे. गुरुवारी रात्री येथील गोदरेज अॅग्रोवेट कंपनीत झालेल्या वायुगळतीत वसाहतीलगतच्या वस्तीतील ३९ जणांना वायुबाधा झाली. यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असून, त्यांना चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कंपनीत हार्बोसाईड या तणनाशकाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी ढोलवीन, एमएसबीडी, सोडीयम क्लोराईड हा माल वापरला जातो. गुरुवारी रात्री बाष्पीभवनाचे काम सुरू असताना येलवीन वायूच्या रिअॅक्टरच्या काचेला तडा गेला व गळती झाली. त्याची ३६ ग्रामस्थांसह कंपनीतील तीन कामगारांना बाधा झाली. त्यांच्यावर परशुराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवकीबाई सखाराम खरात (८०), मंदा शेंडे (३५) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)
एमआयडीसीत वायुगळती, ३९ जणांना बाधा
By admin | Published: March 25, 2017 2:16 AM