मुंबई : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून विविध पदांसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉपी झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. परीक्षेच्या घाटकोपर केंद्रावर तब्बल दोन तास विलंबाने पेपर सुरू झाल्याने परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच उप मुख्य लेखा अधिकारी पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे चार प्रश्न आल्याने संबंधित पदाच्या मुलाखतीचा कार्यक्रम एमआयडीसीने रद्द केला आहे.महामंडळाकडून गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील लेखा अधिकारी, उप मुख्य लेखा अधिकारी, व्यवस्थापक विधी, क्षेत्र व्यवस्थापक या पदांसाठी २४ आॅगस्ट व ७ सप्टेंबर रोजी एमकेसीएलमार्फत आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रत्येक उमेदवारास स्वतंत्र बैठक क्रमांक दिला होता. या क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बसविणे बंधनकारक असताना जसे विद्यार्थी परीक्षेला येतील, त्याप्रमाणे बसविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना एकच प्रश्नांचा संच देण्यात आला. ७ सप्टेंबर रोजी घाटकोपर परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांचा पेपर तब्बल दोन तासांनी सुरू झाला. यामुळे हा पेपर फुटला असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. याबाबत एमआयडीसीच्या महाव्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, उप मुख्य लेखा अधिकारी पदासाठी देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. ४0, ५८, ५९ व ८२ या प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालिकेत चुकीची असल्याचे, समजताच एमआयडीसीने या पदाच्या मुलाखती लांबणीवर टाकल्या. सुधारित मुलाखतीची यादी व तारीख स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमआयडीसीचे महाव्यवस्थापकांनी सूचना पत्र जारी केले आहे.
एमआयडीसीच्या परीक्षेत गोंधळ
By admin | Published: September 13, 2014 4:36 AM