औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनापूर्वी दोन तास अगोदर सकस दूध देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मत माध्यान्ह भोजन योजनेचे केंद्रीय संचालक गया प्रसाद यांनी येथे व्यक्त केले.केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारतर्फे संयुक्त विद्यमाने शनिवारी माध्यान्ह भोजनासंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. शालेय पोषण आहार योजना विविध राज्यांमध्ये कशा प्रकारे राबवली जाते, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर विवेचन केले. प्रामुख्याने महाराष्ट्रात ही योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवली जात असल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या शालेय पोषण आहार योजनेत काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचाही पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमताही विकसित झाली पाहिजे, यासाठी मुलांना भोजन देण्यापूर्वी २ तास अगोदर सकस दूध देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.प्रधान सचिव नंदकुमार यांनी ही योजना राबवताना येणाऱ्या अडचणी शासनस्तरावरून तत्परतेने सोडविण्याची ग्वाही दिली. अशा उपक्रमांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विविध राज्यांतील अधिकाऱ्यांनी योजनेसंबंधीचे अनुभव, निरीक्षण व त्रुटीबद्दल कार्यशाळेत ऊहापोह केला. (प्रतिनिधी)
माध्यान्ह भोजनापूर्वी मुलांना दूध देणार
By admin | Published: July 12, 2015 2:27 AM