मुंबई: राज्यातील शाळांची घंटा १ डिसेंबरला वाजली. त्यामुळे शाळा पुन्हा गजबजल्या. अनेक महिने घरात राहिलेले विद्यार्थी शाळेच्या निमित्तानं एकमेकांना भेटले. त्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता शाळा पुन्हा बंद होऊ शकतात. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत.
राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली. आता हा आकडा ५० च्या पुढे गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. 'ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत,' असं गायकवाड यांनी सांगितलं. त्या एएनआयसोबत बोलत होत्या.
कोरोनामुळे २० महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असलेल्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू झाल्या. पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागांत पहिली ते चौथी आणि शहरी भागांत पहिली ते सातवीचे वर्गही ऑफलाइन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. त्यानंतर १ डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्या.
ओमायक्रॉननं चिंता वाढवलीदिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. त्यामुळेच आता देशातील एकूण रुग्णसंख्या २१६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ९० रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ओमायक्रॉनचे जवळपास अर्ध्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत.