नवी मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी पावसाचे आगमन झाले असून शहरातील लोकल सेवेला गळती लागली आहे. नवी मुंबईत दररोज हजारो प्रवासी हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करतात, मात्र या प्रवाशांना पावसाळा सुरु होताच गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे फलाटांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निकामी खिडक्या, रेल्वेचे नादुरुस्त दरवाजे, मोडक्या आसन व्यवस्था, फलाटांवरील छतांमधून गळणारे पाणी यामुळे प्रवाशांनी कसा प्रवास करायचा, असा प्रश्न नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्याविषयी सिडको आणि प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, तुर्भे, घणसोली आदी रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांना फलाटावरील गळक्या छताखाली लोकलची वाट पाहत उभे राहावे लागते. इंडिकेटर बंद पडल्याने लोकलची वेळ कळत नाही. या मार्गावर आता बारा डब्यांच्या लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अनेकदा याबाबत उद्घोषणा होत नाही. शिवाय गाडीवरही लिहिलेले नसल्याने प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होते. फलाटांची उंची वाढविण्याचे काम अजूनही सुरुच असल्याने बांधकाम साहित्य अनेक ठिकाणी पडलेले दिसते. बेलापूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने प्रवाशांना फेरा मारून यावे लागत आहे. फलाटांची उंची वाढविण्याचे पावसाळ््यापूर्वी पूर्ण करण्यात येणार होते मात्र जून महिना संपत आला तरी काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. अनेक वेळा फलाटांवरील दिवे बंद असतात. रात्रीच्या वेळी सानपाडा, जुईनगर स्थानकातील इंडिकेटर बंद असतात शिवाय लोकल ड्रायव्हरच्या केबिनमध्येही अंधार असल्याने गाडी नेमकी कुठली आहे, हेच समजत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. >प्रवाशांची पळापळ९ आणि १२ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून नेमकी किती डब्यांची लोकल आहे याची सूचना न झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. लोकल फलाटावर येताच प्रवाशांची दोन्ही बाजूंनी पळापळ होत असल्याची व्यथा नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी मांडली आहे. यामध्ये वयोवृध्द, महिलावर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचेही धुरत यांनी सांगितले.
गळक्या लोकलमुळे प्रवासी होताहेत हैराण
By admin | Published: June 29, 2016 2:12 AM