मुंबई : मेट्रो टप्पा ३ या प्रकल्पासाठी मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये बेलार्ड इस्टेटमधील पोर्ट हाऊसमध्ये तात्पुरती स्थलांतरित करण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने आज या संबंधीचा आदेश काढला.या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसला ३७२० चौरस फूट, शिवसेनेला २१६०, राष्ट्रवादी काँग्रेसला ८०४४ चौरस फुटाचे कार्यालय पोर्ट हाऊसमध्ये मिळेल. या शिवाय, भारिप-बहुजन महासंघ ५७५, शेतकरी कामगार पक्ष १६५०, पीपल्स रिपब्लिकन पक्षाला (कवाडे गट) २२८, रिपाइं (डेमॉक्रॅटिक) ६०० तर समाजवादी पार्टीला १३०० चौरस फुटाचे कार्यालय मिळेल. सर्वांसाठी मिळून १८ हजार २७७ चौरस फूट जागेवरील कार्यालये उपलब्ध करुन दिली जातील. या पार्श्वभूमीवर, वरील राजकीय पक्षांची कार्यालये पोर्ट हाऊसमध्ये लवकरच सुरू करण्यात येतील. सध्या फ्री प्रेस जनरल मार्गावर असलेल्या कार्यालये पूर्णत: हटविली जाणार आहेत. फ्री प्रेस जनरल रोडवरील शासकीय कार्यालयेदेखील स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यात, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र, सहाय्यक संचालक व स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, अधिदान व लेखाधिकारी, संचालक लेखा व कोषागरे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, रंगभूमी प्रयोग व परिनिरिक्षण मंडळ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
मेट्रोसाठी राजकीय पक्ष कार्यालयांचे स्थलांतर
By admin | Published: October 23, 2015 1:53 AM