- फारूख शेख, पाटण (चंद्रपूर)चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यात एका गावातील २३ कुटुंबांनी नापिकी व जादूटोण्याच्या भीतीने तेलंगण राज्यात स्थलांतर केले आहे. यामुळे संपूर्ण गाव ओसाड झाले आहे.ही कुटुंबे गेल्या ४० ते ५० वर्षांपासून भाईपठार कोलामगुडा येथे राहत होती. गेल्या पाच वर्षांपासून नापिकीमुळे हातात काहीही उत्पन्न येत नाही आणि दुसरीकडे सावकाराचे कर्ज वाढत चालले होते. यामुळे ही कुटुंबे त्रस्त होती. याशिवाय गावात एकापाठोपाठ तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. हे गावावर कोणीतरी जादूटोणा करीत आहे व यामुळेच शेतीतही चांगले पीक येणे अवघड झाले आहे, अशी धारणा गावकऱ्यांची झाली.आणखी काही तरी वाईट होईल, या भीतीने गावातील २३ कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती या कुटुंबांपैकी एक असलेल्या भीमू जलपती कुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तथापि, या गावकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेकडून सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्य डॉ. पंकज पवार यांनी कुमरे यांची भेट घेऊन या २३ कुटुंबांना गावात परत आणण्यासाठी शासनातर्फे पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.- या सर्व कुटुंबांना शासनातर्फे घरकुल मिळाले आहे. पण ती आता ओस पडली आहेत. गावात सिमेंटचे रस्ते, विद्युतपुरवठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप आहे. असे असतानाही गावात मात्र नागरिक वास्तव्यास नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जादूटोण्याच्या भीतीने तेलंगणमध्ये स्थलांतर
By admin | Published: March 31, 2016 1:47 AM