नायगाव : कामशेत रेल्वेस्थानक हे नाणे मावळ, पवन मावळ व परिसरातील नागरिकांचे एकमेव रेल्वे स्थानक आहे. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. पुणे ते लोणावळा परिसरात कामाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्या दृष्टीने स्थानकावर सुविधांची वानवा आहे. यामुळे प्रवासांची गैरसोय होते. स्थानकावर वाढलेले गवत, कचरा आणि स्वच्छतागृहात घाण आहे. परिसरात अस्वच्छता पसरलेली असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्थानकावर सर्वत्र गुटखा खाऊन थुंकले आहे. बहुतेक ठिकाणी सांडपाण्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने त्याचा वापर करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे प्रवाशांना उघड्यावर लघुशंकेस उभे राहतात. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होते. स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे वाढली आहे. त्यात साप, विंचू अशा विषारी घटकांना राहण्यास वाव मिळत आहे. स्थानकावर पूर्ण शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेड असते उभे राहावे लागते. पावसाळ्यात प्रवाशांची तारांबळ उडते. स्थानकावर दिव्यांची कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी अंधार असतो. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. ड्रेनेजला झाकण नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून, त्यामध्ये लहान मुले पडण्याची भीती आह.े तसेच तिकीट खिडकीच्या समोर सांडपाणी साचले आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी, शेड उभारावे, दिवे लावावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)> कामशेत स्थानकावर असलेले स्वच्छतागृह खूपच घाणेरडे आहे. त्यामध्ये जाण्याची इच्छा होत नसल्याने गैरसोय होते. लवकरात लवकर स्वच्छतागृहाची स्वछता करावी. नियमितपणे स्वच्छता ठेवली जावी. - सखुबाई, प्रवासी स्थानकावर शेड नसल्यामुळे उन्हाळ्यात उन्हात उभे राहावे लागते. पावसाळ्यात मध्यभागी असलेल्या शेडमध्येच उभे राहावे लागते . धावपळ करून लोकल पकडावी लागते. त्यामुळे गैरसोय होत असून तारांबळ उडते. -पोपट वाळुंजकर, प्रवासी
अस्वच्छतेमुळे प्रवासी होताहेत हैराण
By admin | Published: June 29, 2016 1:42 AM