घोडेगाव : लग्नामध्ये माईक बंद पडल्याच्या कारणावरून डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथे गणेश किसन कोरके व संतोष किसन कोरके या दोघा भावांनी दत्तात्रय चिमण लोहकरे (वय ३५) याला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहेत. याप्रकरणी मयत व्यक्तीचा भाऊ दीपक चिमण लोहकरे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मापोली येथे राहणारे दत्तात्रय लोहकरे हे मंडप व स्पीकरचा व्यवसाय करीत होते. कोलतावडे येथील शंकर हेमाजी लोहकरे यांच्या मुलीच्या लग्नात दि.१४ रोजी मंडप व स्पीकर बसविण्याची सुपारी त्यांनी घेतली होती. त्याच दिवशी मापोली येथील देवानंद कसबे यांच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात मंडप व स्पीकर बसविण्याची सुपारी घेतली होती. दि.१४ रोजी शंकर लोहकरे यांच्या मुलीच्या लग्नात अचानक माईकला करंट आल्याने माईक बंद पडला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले कार्यमालकाचे पाहुणे गणेश कोकरे व संतोष कोरके यांनी माईक बिघडल्याच्या कारणावरून दत्तात्रय लोहकरे व त्याच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांशी वाद घातला. येथून दत्तात्रय लोहकरे घरी मापोलीला निघून आले व घरी आल्यानंतर देवानंद कसबे यांच्या कार्यक्रमात जनरेटर घेऊन गेला. त्यानंतर ते घरी आलेच नाही. म्हणून दि. १५ रोजी घरच्यांनी शोधाशोध केली असता, डिंभे खुर्द गावाजवळ रस्त्याच्या कडेला दत्तात्रय लोहकरे मिळून आले. त्या वेळी दत्तात्रय लोहकरे हे जिवंत होते. त्यांना भावाने विचारले असता, ‘गणेश कोरके व संतोष कोरके यांनी मला डिंभे खुर्द येथील पोटकुले यांच्या बिल्डिंग समोर नेऊन काठी व लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली’ असे सांगितले. तेथून त्याला घोडेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले व नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुणे येथे वायसीएम रुग्णालयात हलविले. याठिकाणी उपचार घेत असताना, दि.२१ रोजी दत्तात्रय लोहकरे याचे निधन झाले. निधनानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा गणेश कोरके व संतोष कोरके यांच्यावर दाखल केला असून, त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बी. एन. पवार, सहायक फौजदार सदाशिव हांडे, पोलीस हवालदार एस. सी. भोईर, एस. एम. कोबल, गिजरे मामा करत आहेत. (वार्ताहर)
लग्नात माईक बंद पडणे जिवावर बेतले
By admin | Published: May 23, 2016 1:57 AM