ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या अडचणीत आणखी भर पडली असून शीनाचा भाऊ मिखाईल बोराच्या हत्येची सुपारी घेणा-याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिखाईलच्या हत्येसाठी इंद्राणीने या काँट्रेक्ट किलरला तब्बल अडीच लाख रुपयांची सुपारी दिली होती अशी माहितीही उघड झाली आहे.
शीना बोराचा भाऊ मिखाईल बोराने पोलिसांना दिलेल्या जबाबात इंद्राणीने तीन वेळा माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मिखाईलच्या हत्येची सुपारी घेणा-या काँट्रेक्ट किलरला अटक केली आहे. या गुंडाचे नाव अद्याप उघड झालेले नाही. मिखाईलला मनोरुग्ण करून वाटेतून बाजूला काढण्याचे इंद्राणीच्या मनात होते अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व चालक श्याम रॉय या तिघांची पोलिस कोठडी आज संपणार असून थोड्याच वेळात त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.