Milind Deora News: काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपाची वाट धरणाऱ्या नेत्यांचे नशीब फळफळले आहे. या नेत्यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले असून भाजपाची महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची यादी येताच शिवसेनेने देखील आपला उमेदवार जाहीर केला आहे.
गेल्या महिन्यात लोकसभेची जागा ठाकरे गट आपल्याला सोडत नसल्यावरून बिनसल्याने मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती. शिवसेनेने देवरा यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे. तर भाजपाने नुकतेच डेरेदाखल झालेल्या अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर देवरा यांनी हा निर्णय घेतला होता. यावेळी देवरा यांना शिंदे लोकसभेची उमेदवारी देतील अशी चर्चा होती. परंतु देवरा यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. ''शिंदे साहेबांना मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. मी खासदार बनून मी चांगलं काम करू शकतो, असं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं मत आहे. त्यांनी विश्वास टाकला. त्याबद्दल आभार मानतो.'', असे देवरा म्हणाले होते.
भाजपाचे उमेदवार कोण...राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानेमहाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांची यात वर्णी लागली आहे. त्यासोबत पुण्याच्या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही यात स्थान मिळाले आहे. त्यासोबत नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.