लोकसभेची जागा काँग्रेसला सुटत नसल्याचे पाहून माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस सोडत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज दुपारी प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. अद्याप अधिकृत जाहीर झालेले नसले तरी ते दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतील असे वृत्त आहे.
देवरा यांनी आज सकाळीच काँग्रेस सोडत असल्य़ाचे जाहीर केले होते. आज दुपारी देवरा यांच्यासोबत १० माजी नगरसेवक, २० पदाधिकारी आणि जवळपास साडे चारशे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. मी विकासाच्या मार्गावर जात असल्याची प्रतिक्रिया देवरा यांनी दिली आहे.
पक्ष प्रवेशकरण्यापूर्वी देवरा हे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाणार आहेत. तिथे शिवसेना आमदार सदा सरवणकर हे त्यांचे स्वागत करतील. यानंतर देवरा तिथून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. तिथे ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील, असा कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे.
देवरा खासदारकीसाठी शिवसेनेत जात असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. असे असले तरी देवरा यांचे खास असलेले काँग्रेस आमदार अमीन पटेल हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे समजते.